माझं आजोळ
माझं आजोळ
" कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी "
असं हे कोकण! जिथे माझं आजोळ, आणि माझी साधी भोळी माणसं. माझ्या आयुष्यातील माझी सर्वात प्रिय
माणसं . त्यांच्याबद्दल काय आणि किती लिहू असं वाटतं . अतिशय समृध्द असं बालपण मला लाभलं ते या प्रेमळ माणसांमुळे .
माझे आजी आजोबा मामा मामी माझी भावंडं यांनी माझं बालपण अगदी व्यापून गेलंय. मनाच्या कप्प्यातल्या या आठवणी काळाच्या ओघात पुसून जाऊ नयेत म्हणून आणि व्यक्त व्हावंसं वाटतंय म्हणून हा लिहिण्याचा खटाटोप .
माझं आजोळ गुहागरचे . गुहागर तालुक्यात असगोली नावाचं छोटं गाव आहे तिथे माझं आजोळ!
उन्हाळ्याची सुट्टी लागली की मी आजोळी पळत असे . आई मला सोडून येत असे. अगदी सुरुवातीला माझ्याबरोबर तीही रहात असे पण नंतर नंतर तिला सुट्टी नसल्यामुळे मला सोडून परत येत असे. तो हि एक किस्साच आहे. आधी आईशिवाय न राहणारी मी एकदा कशीबशी तयार झाले राहायला तिच्याशिवाय आणि आई निघून गेली. पूर्ण दिवस छान निघून गेला आणि मग रात्री मात्र आईची आठवण यायला लागली आणि रडू यायला लागलं ,झालं! मामाने अस्मादिकांची रवानगी दुसऱ्या दिवशीच आईकडे करून दिली. सकाळपर्यंत मी ठीक झाले होते मला अजून राहायचं होतं पण मामांनी माझ्या रडण्याची धास्ती घेतली होती. 😊😊 तर असा हा माझा आईशिवाय राहण्याचा पहिलाच प्रसंग.
अगदी मागे जावं ना तर आठवतं माझ्या मावशीच्या मांडीवर बसून दहीभात खाणारी मी. माझी धाकटी मावशी! माझा जीव की प्राण ! ती ऑफिस ला जायच्या आधी ती मऊभाताचा नाश्ता करत असे आणि मी तिच्या मांडीवर बसून माझा वाटा हक्काने वसूल करून घेत असे.
आणखी एक आठवण म्हणजे आम्ही गुहागर बस स्टॅन्ड वर पोहोचलो कि आधी आजोबांच्या 'कंपनीत' हजेरी लावून मग पुढे जात असू. आजोबा माझे निष्णात शिवणकाम करायचे . गुहागरला सोहोनी म्हणून त्याचे स्नेही होते त्यांच्या घराच्या पडवीत त्यांनी आपले बस्तान मांडले होते. त्याला मी 'कंपनी' म्हणत असे. तिथे पोचल्यावर कधी आजोबाना भेटते असं होऊन जाई .आईला पण तसंच वाटत असणार कारण त्यांच्यावर तिचा आणि तिच्यावर त्यांचा विशेष जीव. मग आजोबांजवळ आमच्याबरोबरच घरी येण्याचा प्रेमळ हट्ट मी करत असे आणि कधीकधी तो पूर्णही होत असे.
आजोबा भल्या पहाटे पाच वाजता उठत आणि त्यांची नैमित्तिक कामे उरकत. आणि मी त्यांच्या मागे मागे करत असे. घरी इतक्या लवकर कधीही न उठणारी मी तिथे मात्र आजोबा आजी बरोबर उठत असे. मला चहाबरोबर बिस्कीट खायची सवय होती, तिथे तेव्हा बिस्कीट कुठून मिळणार त्यामुळे आजोबा मला चहाबरोबर गावठी हातसडीचे पोहे देत असत. आजतागायत त्या चहापोह्यांची चव मी कुठेही चाखली नाही. माझ्या आजी आजोबांच्या बरोबर ती चवही हरवली कदाचित!
चहा पिऊन आजोबा म्हशीचं दूध काढायला जात. तिथेही मी त्यांच्या मागे असे. आंबोण कालवणे ,ते म्हशीला खायला देणे ,गोठा साफ करणे, दूध काढणे हे सगळे माझ्यासाठी नवीन असे आणि ते बघणे म्हणजे मला अप्रूप असे. पुढे मग धाकट्या मामाने मला दूध काढणे, शेण बाजूला करणे ("दूध आवडतं ना मग शेणाची घाण वाटतं कामा नये असं म्हणून ) सगळं शिकवलं.
दूध काढून झालं कि आजोबा ताक करीत असत. मोठे डेरा होता आमच्याकडे. तिथेपण मी लुडबुड करीत असे. पण न कंटाळता, न रागावता माझी हि सगळी लुडबुड आजोबा चालवून घेत असत.
अंघोळ पूजा आटोपून मग ते त्यांच्या दुकानात जायला निघत. मग मी त्यांच्या मागे " मला पाटी आणा ,कंपासपेटी आणा"असा हट्ट करत असे. माझ्यासाठी त्यांनी पाटी आणून दिली होती. बरेच वर्ष ती तिथे होती. सनकाड्यांची एक पत्र्याची डबी होती ती माझ्यासाठी त्यांनी कंपासपेटी म्हणून दिली होती.
अजून एक आठवतंय ते म्हणजे एका रात्री म्हैस व्याली तो प्रसंग. हे सगळे त्या वयात माझ्यासाठी विशेष होते. आयुष्यातला पहिला खरवस मी तेव्हा खाल्ला आणि तो आवडला कि आजी ने आमच्या घरी काम करायला येणाऱ्या म्हाताऱ्या आजीसाठी चहाच्या भांड्यात वेगळा करून ठेवला होता तो पण खाऊन टाकला. सगळ्या गमतीजंमती आहेत . पण आजी आजोबा कधीही ओरडले नाहीत किंवा चिडले नाहीत. त्यांच्या चेहेऱ्यावर नाराजीची पुसटशी रेषा पण उमटत नसे.
आजोळचा विचार आला कि या सगळ्या आठवणी गर्दी करतात. रांगेत उभे राहणे जणू त्यांना मान्यच नाही. आधी मी आधी मी करत माझ्याभोवती फेर धरतात आणि मग मी पण हरवून जाते. त्यामुळे एका साचेबद्ध पद्धतीने लिहायला जमेल असं वाटत नाही. तरीपण प्रयत्न जरूर करेन.
खूपच मस्त लिहिलंय, मुंबईत यावसच वाटत नसेल ना !
ReplyDeleteThank you.
DeleteHo na Masta watta!
फारच सुंदर. आजोळचे चित्रच उभे राहिले. अजून लिहा...
ReplyDeleteAll the best
I am interested in helping you, please let me know how I can in cash and kind.
ReplyDeleteHiren Malankar